मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाचा अज तिसरा दिवस आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिरकणी कक्षावरुन आमदार सरोज अहिरे यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. या विषयाची दखल घेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुसज्ज हिकरणी कक्ष उपलब्ध करुन दिला. हा कक्ष आरोग्यमंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आमदार सरोज आहिरे यांना उपलब्ध करुन देण्यात आला. यावेळी निलम गोऱ्हे आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यात मिश्कील टोलेबाजी झाली. (Maharashtra Budget 2023)
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशाचा तिसरा दिवस, राज्यातील सर्व आमदार अधिवेशनासाठी मुंबईत आले आहेत. दरम्यान, देवाळालीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या ५ महिन्यांच्या बाळासह उपस्थित आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी हिरकणी कक्षावरुन माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. यावेळी याची दखल घेत २४ तासात मंत्री तानाजी सावंत यांनी कक्षाची व्यवस्था केली. यावेळी या कक्षाची विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनीही पाहणी केली.
संजय राऊतांविरोधात सर्वपक्षीय आमदार एकवटले, 'हक्कभंगा'ची मागणी; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणं भोवणार?
मंत्री सावंत आणि निलम गोऱ्हे यांच्यात टोलेबाजी
काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुसज्ज हिरकणी कक्ष आमदार सरोज आहिरे यांना देण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात मिश्कील टोलेबाजी सुरू झाली. यावेळी आमदार सरोज आहिरे यांचे बाळ मंत्री तानाजी सावंत यांच्या हातात होते, सावंत बाळाला खेळवत होते. यावेळी निलम गोऱ्हे यांनी सावंत यांना टोला लगावत अहिरे यांना म्हणाल्या, 'तुमच्या बाळाला त्यांच्याकडून घ्या. नाहीतर ते गुवाहाटीला घेऊन जातील'. असा टोला गोऱ्हे यांनी मंत्री सावंत यांना लगावला. यावेळी सावंत यांनीही गोऱ्हे यांना प्रत्युत्तर दिले. सावंत म्हणाले,'तुमच्यासह गुवाहाटीला घेऊन जातो', असं सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Budget 2023)
दरम्यान, यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी निलम गोऱ्हे आणि राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हिकरणी कक्षाची सुविधा निर्माण व्हावी अशी विनंती आमदार अहिरे यांनी मंत्री सावंत यांच्याकडे केली. यावेळी मंत्री सावंत म्हणाले,'आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडत कर्तव्यदक्ष असणाऱ्या महिला पोलिसांसाठी, असे हिरकणी कक्ष येत्या काळात उभारण्याचा मानस आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.