Maharashtra Budget : 'शेवटचे बजेट असल्याच्या अविर्भावात ...'; जयंत पाटलांचा अर्थसंकल्पावर टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 05:54 PM2023-03-09T17:54:13+5:302023-03-09T17:59:49+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सभागृहात मांडले.
मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सभागृहात मांडले. यात राज्यातील शेतकरी, महिलांसाठी एसटी मध्ये ५० टक्के सुट, अंगणवाडी सेविका तसेच आशा स्वयंसेविकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी कौतुक केले तर विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर टीका केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली.
'हे बजेट शेवटचे असल्याच्या अविर्भावात मांडलं आहे. जेवढ्या कल्पना असतील तेवढ्या सगळ्यांचा उल्लेख या बजेटमध्ये केला आहे. प्रोव्हीजन यात मर्यादीत आहेत. पीडब्लूडीला एक हजार कोटी कमी दिले आहेत. पर्यावरणाला आम्ही दिले त्यापेक्षा कमी पैसे दिले आहेत. म्हणजे भाषण उत्तम होते, पण प्रोव्हीजन आहे का?" असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी केला.
'आता मिळालेल्या आकडेवारीवरुन हे समोर आलंय. दरवर्षी अर्थसंकल्पाचे पुस्तक मिळायचे, या वर्षी पेन ड्रोईव्ह दिले आहेत. त्यामुळे ते सर्व पाहून त्यावर अभ्यास करुन आम्ही बोलू', असंही जयंत पाटील म्हणाले.
या सगळ्या घोषणा राज्यातील सर्व देवस्थान, मंदिरांनी थोडे थोडे द्यायचा प्रयत्न केला आहे. दोन गोष्टी यात चांगल्या केल्या आहेत, एक शेतकऱ्यांसाठी ६ हजारांची केलेली घोषणा, दुसरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी १ रुपयांत पीक विमाची केलेली घोषणा. पुढ त्यांना बजेट मांडायचे नाही या अविर्भावात त्यांनी बजेट मांडले आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
'आम्ही गाजर हलवा तर देतोय, तुम्ही काहीच दिले नाही': एकनाथ शिंदे
'देवेंद्र फडणवीसांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. आरोग्य योजना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांकडे बोलायला जागा नाही, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.