Maharashtra Budget 2023: बोलण्यावर नाही, कृतीवर भर; राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची अर्थसंकल्पात तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:27 PM2023-03-09T15:27:53+5:302023-03-09T15:29:17+5:30
Maharashtra Budget 2023: मुंबई-पुणे रिंगरोड, विरार-अलिबाग मार्ग, यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पा सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असून, राज्यभरातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटी रुपये, एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. तसेच ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार येणार असून, त्यासाठी ४२४ कोटी रुपये तरतूद करण्यात येत आहे. याशिवाय गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी १६२.२० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद, मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी, विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद, रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायब्रीड अॅन्युईटीतून ७५०० कि.मी.चे रस्ते/९० हजार कोटी रुपये, आशियाई बँक प्रकल्पातून ४६८ कि.मी.चे रस्ते/४ हजार कोटी रुपये, रस्ते व पुलांसाठी १४ हजार २५५ कोटी रुपये, यातून १०,१२५ कि.मी.चे कामे, २०३ पूल व मोर्यांची कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय, जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग ४५०० कि.मी./३ हजार कोटी रुपये, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ६५०० कि.मी., मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना आणली जात आहे. सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना आणली जाणार आहे.
दरम्यान, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधीची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज या ८४ कि.मी/४५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या ४ प्रकल्पांना ५० टक्के राज्यहिस्सा देणार आहे. सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी २५ नवीन उड्डाणपूल आणि १०० बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"