मुंबई: वर्तवण्यात आलेल्या शक्यतांनुसार अभूतपूर्व नाट्यमय घडामोडींसह महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांचे अभिभाषण सुरू झाले. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी आपले भाषण दोन मिनिटांमध्ये आटोपते घेऊन तेथून काढता पाय घेतला. यावर राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
अपेक्षेनुसार अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली असून, ती विरोधकांमुळे नाही, तर सत्ताधाऱ्यांमुळेच ही वादळी सुरुवात झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. त्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. नेहमीच्या पद्धतीनुसार राज्यपाल विधिमंडळात दाखल झाल्यानंतर त्यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होते. मात्र, राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोंधळाला सुरुवात केली.
ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे
ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असे निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यपालांनी अभिभाषणाच्या प्रथेला फाटा देत थेट विधिमंडळ सोडून सभागृहातून काढता पाय घेतला. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले होते.