Maharashtra Budget Session 2022: नवाब मलिक राजीनामा द्या, सभागृहांत गोंधळ; भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 05:22 AM2022-03-04T05:22:14+5:302022-03-04T05:24:14+5:30
Maharashtra Budget Session 2022: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भाजपने गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भाजपने गुरुवारी गोंधळ घातला. भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी आणि निषेधाचे फलक दाखवत कामकाजात व्यत्यय आणला. विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज रेटून नेले.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. कुविख्यात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक संबंधांच्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटक झाली आहे. नैतिकदृष्ट्या त्यांना आता मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. सरकारने त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी गुरुवारी विधान परिषदेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, या गदारोळाकडे दुर्लक्ष करीत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसाचे कामकाज पूर्ण केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि बॉम्बस्फोटातील आरोपींशी जागेचा व्यवहार करणाऱ्या मलिक यांची प्रवृत्ती जनता पाहत आहे, महाराष्ट्राचा अवमान होत असल्याचे सांगत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी बाकांवरून सुरू झाली. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेधाचे फलक फडकविले; तर, काही सदस्य सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. मात्र, सभापतींनी विरोधकांचे कोणतेच विधान रेकॉर्डवर जाणार नसल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले.
सभागृहाने भारतरत्न लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली. रामनिवास सिंह, एन. डी. पाटील, सुधीर जोशी, दत्तात्रय लंके, संजीवनी हरी रायकर, आशाताई टाले, कुमुद महादेव रांगणेकर यांच्या कार्याचाही उल्लेख करण्यात आला.
भाजपतर्फे मुंबईत मोर्चा निघणार
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रदेश भाजपतर्फे ९ मार्च रोजी मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान मोर्चा निघणार आहे. देवेंद्र फडणवीस त्याचे नेतृत्व करणार आहे.