मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प आणि दिसणारा अर्थसंकल्प वेगळा आहे. सरकारने दाखवलेली गुंतवणूक आणि केलेला खर्च यात फरक आहे. बजेट आणि खर्च यांचा ताळमेळ नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अर्थमंत्र्यांनी राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे सूतोवाच केले. पण चार वर्षांपूर्वी आमचे सरकार असताना मी जेव्हा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी माझ्यावर टीका केली होती. आता त्याचच अनुकरण केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यावरील कर्जाचा बोजाही वाढत असून खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी सरकारच्या अर्थसंकल्पाची अवस्था असल्याचे फडणवीस म्हणाले. सरकारने मांडलेला अर्थ संकल्प वेगळा आणि सांगितलेला अर्थसंकल्प वेगळा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आर्थिक शिस्त कोणत्याही विभागात दिसत नाही. बजेट दाखवण्याकरिता करत आहे. २२ हजार कोटी रुपयांनी तुटीची वाढ वाढलेली आहे आणि खर्च मनमानी होत आहे. वाढत्या कर्जाची चिंता करायची गरज नाही. मात्र ते खर्च कुठे करतात हे पाहिले पाहिजे. दोन लाख कोटी रुपयांनी कर्ज वाढल आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला
अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच दिल्याचे दिसत आहे. या अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी ३ लाख १४ हजार ८२० कोटी रुपये म्हणजे तब्बल ५७ टक्के निधी हा राष्ट्रवादीच्या खात्यांना मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या खात्यांना १ लाख १४ कोटी रुपये म्हणजे २६ टक्के निधी मिळाला आहे. सर्वांत कमी १६ टक्के म्हणजे ९० हजार कोटी रुपये हे शिवसेनेच्या खात्यांना मिळाले आहेत. गेल्या वर्षीही असेच चित्र होते. ज्या ठिकाणी पगार जास्त द्यावा लागतो ती खाती काँग्रेसकडे आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात नवे काही दिले नसल्याचे सांगत फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्रीय योजनांच्या आधारेच कामाचे श्रेय लाटत असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्प पाहिला तर चालू योजनाच यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला दिसत आहे, असेही फडणीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकारवर घणाघाती टीका करताना राज्याच्या जीडीपीमध्ये १२ टक्के नव्हे, तर फक्त साडेतील टक्के इतकीच वाढ झाल्याचेही फडणवीस म्हणाले. जिडीपी वाढल्याचे दाखवले जाते, मात्र महसुलात वाढ झालेली दिसत नाही, असेही ते म्हणाले.