Join us

The Kashmir Files: ‘काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ करा; भाजपाची विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 1:22 PM

The Kashmir Files हा चित्रपट देशातील अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

मुंबई: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. हरियाणासह अनेक राज्यांनी या चित्रपटावरील टॅक्स माफ केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजपने विधानसभेत केली आहे. 

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटिसीवरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनीही भाजप नेत्यांना उत्तर दिले. गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. या घडामोडीतच भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी द काश्मीर फाइल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी सभागृहात केली. 

‘काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ करा

काश्मिरवरील समस्यांवर आधारित द काश्मीर फाइल्स नावाचा एक चांगला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. देशातील अनेक राज्यांनी सदर चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. राज्याचे अर्थमंत्री सभागृहात उपस्थित आहेत. त्यामुळे द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्यात यावा, असे माझे त्यांना निवेदन आहे, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली. तत्पूर्वी, भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून द काश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 

हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा

जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा. ज्यामुळे जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले याचे योग्य आणि खरे चित्रिकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा, ही विनंती, असे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे. 

दरम्यान, याचवेळी केरळ काँग्रेसने चित्रपटावर टीकास्त्र सोडले आहे. जम्मू काश्मीरमध्ये पंडितांपेक्षा मुस्लीम जास्त मृत्युमुखी पडलेत असे म्हटले आहे. केरळ काँग्रेसने ट्विट करत सांगितले की, ज्यांनी काश्मिरी पंडितांना निशाणा बनवले ते दहशतवादी होते. १९९० ते २००७ या १७ वर्षाच्या काळात दहशतवादी हल्ल्यात ३९९ पंडितांची हत्या झाली. याच काळात दहशतवाद्यांनी १५ हजार मुस्लिमांची हत्या केली होती. काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडितांचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते. ते आरएसएस विचारसरणीचे होते असेही काँग्रेसने म्हटले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेट २०२२अर्थसंकल्पीय अधिवेशनभाजपामंगलप्रभात लोढाबॉलिवूड