लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओबीसी बचाओची टोपी घालून तुम्ही आला आहात; पण या आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकारच तुम्हाला टोपी घालण्याचे काम करत आहे, ती टोपी मात्र तुम्ही घालून घेऊ नका, असा चिमटा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी विधानसभेत काढला. त्यावर, एकमेकांवर चिखलफेक करून काहीही होणार नाही. तुम्ही केवळ राजकारण करत आहात, असा हल्लाबोल भुजबळ यांनी केला.
भाजपचे सगळे आमदार ओबीसी बचावच्या टोप्या घालून आले होते. एका आमदाराने भुजबळ यांनाही तशी टोपी दिली आणि त्यांनी ती घातली. त्याचा संदर्भ फडणवीस यांनी दिला. सर्व कामकाज बाजूला सारून ओबीसी आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी फडणवीस यांनी कामकाज सुरू होताच केली. सर्वोच्च न्यायालयात सरकारची ओबीसी मुद्द्यावर पुरती नाचक्की झाली आहे. आता ओबीसी आरक्षण नाही तर निवडणूक नाही असा ठराव तुम्ही मंत्रिमंडळात करत जाता अन् तिकडे निवडणुका होत राहतात. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नका, ही आमचीदेखील मागणी आहे; पण तसे करवून दाखवण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. ओबीसी आरक्षण न देण्यासाठी कोणाचा दबाव आहे, असा सवाल करीत नवा समर्पित आयोग स्थापन करून त्यामार्फत इम्पिरिकल डाटा दोन महिन्यांच्या आत तयार करा, असे फडणवीस म्हणाले.
- २०१० रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर तत्कालीन राज्य सरकारने इम्पिरिकल डाटा गोळा केला. २०१६ रोजी तो केंद्र सरकारकडे सुपुर्द केला. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले, असा हल्लाबोल भुजबळ यांनी केला.
- मी टोपी घातली. विरोधी पक्षनेते समजूतदार आहेत. मी मंत्री म्हणून नव्हे तर ओबीसी कार्यकर्ता म्हणून विनंती करतो की, आपण सगळे एकत्र येऊन ओबीसींना आरक्षण मिळवून देत देशासमोर उदाहरण घालून देऊ, असेही भुजबळ म्हणाले.