Join us

Maharashtra Budget Session 2022: ओबीसी आरक्षणावरून विधिमंडळात गदारोळ; गोंधळात दोन्ही सभागृहांचे कामकाज आटोपले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 5:23 AM

Maharashtra Budget Session 2022: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गोंधळ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा बहाल करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी जोरदार गोंधळ झाला. या गोंधळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज संपले. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कामकाज बाजूला ठेवून आधी ओबीसी आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी केली. फडणवीस यांचे भाषण होताच भाजपच्या आमदारांनी फलक फडकविले आणि घोषणाबाजी सुरू केली. 

सगळे आमदार वेलमध्ये उतरले. या गदारोळात कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. तिसऱ्यांदा कामकाज सुरू झाल्यानंतरही घोषणाबाजी सुरू होती. त्यातच सत्तारुढ बाकावरून ‘मोदी, मोदी’ असे आवाज पाच-सहा तरुण आमदार देऊ लागले आणि भाजप सदस्यांच्या ‘हाय हाय’च्या घोषणेशी तो आवाज जोडला गेल्याने भाजप आमदारांची पंचाईत झाली. मग त्यांनी घोषणा बदलल्या.

फडणवीस यांच्या भाषणानंतर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ बोलत होते. तेव्हाही भाजप आमदारांचा गदारोळ सुरूच होता. दोन सदस्य भुजबळ यांच्याजवळ जाऊन जोरजोराने घोषणा देऊ लागले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मग पुढील कामकाज पुकारले व गदारोळातच ते आटोपले.

विधान परिषद घोषणांनी दणाणली

विधान परिषदेतही या मागणीचे तीव्र पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षाचे समाधान झाले नाही. विरोधी पक्षनेतेे प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली, असेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने समोर आले आहे. 

मागासवर्ग आयोगाला लागणारा निधी, कर्मचारी दिले गेले नाहीत. राज्य सरकारने कोणतीही कृती न करता केवळ केंद्र सरकारशी वाद घालण्यात वेळ घालविला, चालढकलीचे राजकारण केले, असा आरोप दरेकर यांनी केला. आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

‘धिक्कार असो, धिक्कार असो, महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो,’ ‘ठाकरे सरकार हाय, हाय’, ‘आघाडी सरकार हाय, हाय’, अशा घोषणा सुरू झाल्या. या गदारोळामुळे सुरुवातीला वीस मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्याची घोषणा सभापती रामराजे- नाईक निंबाळकर यांनी केली. 

टॅग्स :महाराष्ट्र बजेटअर्थसंकल्पीय अधिवेशनओबीसी आरक्षण