अल्पेश करकरे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरुन निर्माण झालेला वाद आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणामुळे आमदार रवी राणा वादात सापडले आहेत. आष्टेकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात रवी राणा यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय.मात्र राज्य सरकारमधील काही नेत्यांचा मुद्दाम मला अडकवण्याचा डाव होता त्यामुळे संबंधितांवर कारवाई करा असे आज विधानभवनात निदर्शने करत राणा यांनी सांगितले.
शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त आणि पोलीस आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका राणा यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत. पोलीस आयुक्तांनी दबावाखाली येऊन माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप राणा यांनी केलाय. शाईफेकीच्या घटनेवेळी मी दिल्लीत होतो. असं असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी आता अमरावती पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी रवी राणा यांनी आज निदर्शन करत केलीय.
मी हा मुद्दा सभागृहात देखील मांडणार आहे आणि यासंदर्भात पेन ड्राईव्ह मध्ये पुरावे देणार आहे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी चौकशी समिती गठीत करून न्याय देण्याची मागणी करणार आहे असं राणा यांनी म्हटलं आहे.