Maharashtra Budget Session 2022: विधानसभेचा अध्यक्ष कधी? राज्यपालांना दिले पत्र; महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:44 AM2022-03-05T05:44:07+5:302022-03-05T05:44:51+5:30
Maharashtra Budget Session 2022: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवड अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठविल्यानंतर आज मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन निवडणुकीला मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारे स्मरणपत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले. हिवाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर सल्ला घेऊन अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात कळवू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात विनंती करण्यात आली.
मात्र राज्यपालांकडून प्रतिसाद न आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवाहनमंत्री अनिल परब, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री सतेज पाटील या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
१२ आमदारांच्या निवडीचे काय?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ आमदारांच्या निवडीबाबतही विनंती करण्यात आली आहे. लोकशाहीत बहुमताच्या सरकारचे महत्त्व असते, राज्यपालांना लवकर न्याय देऊन विधान परिषदेच्या सभागृहात लोकांची सेवा आणि लोकांच्या प्रश्नाबाबत न्याय देण्याची संधी द्यावी अशी विनंती केली.
राज्यपालांचे खडेबोल
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पूर्वी गुप्त मतदान पद्धतीने होत होती. आपल्याच सरकारने कायदा बदलला. त्यामुळे ही निवडणूक घेण्यासंदर्भात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या व विलंब लागला. पूर्वीचीच पद्धत असती तर असे झाले नसते, या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. दोन तीन दिवसात अध्यक्ष निवडीबाबतचे मत राज्य सरकारला कळवू, असे राज्यपाल म्हणाल्याचे समजते.
ते म्हणतील त्या तारखेला निवडणूक घेऊ – भुजबळ
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ९ तारखेची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यासाठी त्यांच्यावर दबाव आणलेला नाही. त्यांना जी तारीख वाटेल त्या तारखेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेऊ असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.