मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झालं आणि आजचा दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळानं झालेली पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यानंतर संजय राऊतांवरील हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.
हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून आजच नव्याने हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. अध्यक्षांकडून १५ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आले आहे. तर या समितीत भाजपाचे आमदार नितेश राणे, अतुल भातखळकर, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. सदर समितीकडून संजय राऊतांना लगेच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या ४८ तासांत उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती समोर येत आहे.
आम्हाला चोर म्हणताय, चोरांचीच मतं घेऊन राज्यसभेत गेले; गुलाबराव पाटील राऊतांवर संतापले
हक्कभंगाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील अनेक प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतला टार्गेट केलं जात आहे. मी खासदार असल्याने राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. शिवसेनेचा संसदीय लोकशाहीवर विश्वास राहिला आहे. माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात असेल, तर लोकशाहीला घातक आहे. त्यांना हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आशिष शेलार यांच्या मताशी सहमज असल्याचं म्हटलं. पण त्यांनी संजय राऊत यांचं थेट नाव घेणं टाळलं. जर एखादी व्यक्ती विधीमंडळाबाबत असं विधान करत असेल तर ते नक्कीच अशोभनीय आहे. पण त्यांनी खरंच असं विधान केलं आहे का? हेही तपासून पाहिलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जावा. त्यांनी जर तसं विधान केलं असेल तर त्याविधानाशी आम्ही सहमत नाही, असं अजित पवार म्हणाले. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"