"अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली."महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे," असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला."आज विधानसभेत सर्वच सदस्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एकत्र आले असे सांगतानाच दुर्गा भागवत यांनी संस्कृतपेक्षा आधी मराठीचा जन्म झाला आहे असे सांगितले आहे. तर दुसरीकडे दक्षिण प्रांतात आठ भाषा अभिजात दर्जा घेऊन बसल्या आहेत आणि मराठी आजही दिल्लीच्या तख्तावर डोकं घासून आमच्या भाषेला अभिजात दर्जा द्या सांगत आहे," असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे त्याचदिवशी हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केेले.