Maharashtra Budget Session: पोलीस बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार; विधानसभेत राष्ट्रवादी आमदाराचा सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:18 PM2022-03-07T13:18:49+5:302022-03-07T13:19:24+5:30
बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.
मुंबई – बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपा आमदारासोबत राष्ट्रवादी आमदारानेही बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर सरकारला घरचा आहेर दिला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणावरून सभागृहात लक्षवेधी मांडण्यात आली. यावेळी प्रकाश सोळंके यांनी बीडचा बिहार झाल्याची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नाही. गुन्हेगारांना सर्रासपणे अभय देण्याचं काम बीड जिल्ह्यात सुरू आहे असं त्यांनी सभागृहात म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके(NCP Prakash Solanke) म्हणाले की, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जो काही गोळीबार झाला त्यात ज्यांच्यावर गोळीबारी झाली त्यांच्यावर गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले. बीड जिल्ह्यात आज अवैध धंदे सुरू आहेत. दरोडे, चोऱ्या, मटका, वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. बीडचा बिहार झाल्याचं वर्तमानपत्रात छापून येतंय. बीडमध्ये गुन्हेगारी वाढतेय त्याला पोलीस अधीक्षक जबाबदार आहे. पोलीस खात्यात ज्या बदल्या झाल्या त्यात मोठा भ्रष्टाचार झाला. दरमहिन्याला हे पोलीस अधीक्षक प्रत्येक पोलीस स्टेशनमधून हफ्ता गोळा करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत पोलीस अधीक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. त्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी त्यांनी केली.
या लक्षवेधीवर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला गोळीबार प्रकार भयंकर आहे. आरोपींकडून बंदुका आल्या कुठे? बीड जिल्ह्यात गृहखातं पूर्णपणे कोसळलं आहे. या प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी झाली पाहिजे. वाळू माफियांवर पोलीस काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर गृहमंत्र्यांनी वडिलोपार्जित संपत्तीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार घडला. या प्रकरणी दोन्ही बाजूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. तपास स्पष्ट होईल तशी अधिक कारवाई करण्यात येईल. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात येईल असं आश्वासन दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी दिलं.
कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सभागृहात अनेकदा चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी वाळू माफियांची लॉबी सुरू झाली. त्यावर निर्बंध लावण्याचे प्रयत्न निश्चित करू. वाळूमाफियांविरोधात बीड जिल्ह्यात ११९ कारवाया केल्या असून १४६ जणांना अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर येत्या १५ दिवसांत वरिष्ठ पातळीवर अहवाल करून पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.
महाराष्ट्रासारख्या राज्यात माफियांचा जोर वाढल्याची कबुली दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या प्रश्नाला उत्तर देऊन चालणार नाही. तर माफियांचा राजकीय सहभाग वाढला आहे. माफियाराज थांबवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार? हे गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगावं अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी केली. त्यावर गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील. परंतु त्यानंतर कुणीही या कारवाई दरम्यान फोन करू नका असं सभागृहात म्हटलं.