Maharashtra Budget Session: आरेच्या सर्वांगिण विकासासाठी समिती; १७३ कोटींचा निधी, कामांवरील स्थगिती १५ दिवसांत उठवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:15 PM2023-03-10T15:15:03+5:302023-03-10T15:16:07+5:30
Maharashtra Budget Session: आरेतील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह आरेच्या सर्वांगिण विकासासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Maharashtra Budget Session: आरेतील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्या बरोबरच आरेच्या सर्वांगिण विकासासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करीत आरेतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी १७३ कोटींचा निधी देण्यात येईल. यातील ४७ कोटी रूपयांच्या निधी अंतिम मंजुरीसाठी आहे, तो मंजुर करण्यात येईल, असे आश्वासन पशु व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी आरेतील विविध समस्या संदर्भात लक्षवेधी मांडली होते. यात आरेतील अंतर्गत ४५ कि.मी च्या रस्त्यांची दुरावस्था, आरे तलावाचे सुशोभीकरण, आरेतील पिकनिक उद्यान, आरे चेक नाका येथील स्टार शौचालय व छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उभारणे, त्याचबरोबर २ कोटी रूपयांच्या प्रादेशिक पर्यटन निधीला देण्यात आलेली स्थगिती, आरेतील शासकीय रुग्णालयाची दुरावस्था आदि समस्यांवर प्रश्न उपस्थित केले.
यावर आरेतील अंतर्गत ४७ कि.मीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाकडे पाठवलेल्या रूपये १७३ कोटींच्या प्रस्तावाला राज्य शासन मंजुरी देईल का?, प्रादेशिक पर्यटन विभागाने दिलेल्या रूपये २ कोटींच्या निधीतून आरेतील काही कामे करण्यात येणार होती, त्यावर लावण्यात आलेली स्थगिती शासन उठवणार का?, आरे चेकनाक्यावर उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली स्थगिती उठवून प्रवेशद्वार उभारण्यास परवानगी देणार का? आरे तलावातील गाळ काढणे व त्याचे सौंदर्यीकरण कधी करणार? आरेतील पिकनिक उद्यानात जे अनधिकृत काम सुरू आहे त्याला स्थगिती देणार का?, आरेत होणारी अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येणार का? असे प्रश्न आमदार वायकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केले.
याला उत्तर देताना, आरेतील सर्वांगिण विकासाची एक समिती गठीत करण्याची घोषणा करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविलेल्या आरेतील ४५ कि.मीच्या अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निश्चित मदत करण्यात येईल. आरेचा मुख्य रस्ता हा मुंबई महानगर पालिकेच्या ताब्यात आहे. आरे चेक नाका येथे 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या नावाने उभारण्यात येणारे भव्यदिव्य प्रवेशद्वार उभारण्यासाठी पालिका आयुक्तांना बोलावून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. चेक नाका येथे स्टार शौचालय उभारण्यासाठी तात्काळ परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिले.
तर आरेतील शासकीय दवाखाना हा फक्त ओपीडी आहे. त्यामुळे या दवाखान्यात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई महानगरपालिकेला विनंती करण्यात येईल, जेणेकरून करून मनपाच्या जवळच्या ट्रॉमा हॉस्पिटलमधील डॉक्टर या हॉस्पिटलला उपलब्ध होतील, असे आश्वासनही विखे पाटील यांनी दिले. प्रादेशिक पर्यटन विभागाकडून देण्यात आलेल्या रूपये २ कोटींच्या निधीला देण्यात आलेली स्थगिती येत्या १५ दिवसात उठवून निर्णय घेण्यात येईल, आरेतील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्या बरोबरच अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी एक समिती गठीत करण्याची घोषणा पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा विधानसभेत केली.
तसेच आरेच्या सर्वांगिण विकासासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात येत असून सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर सल्लागाराच्या प्रस्तावावर शासन नियुक्त करण्यात येणार्या समितीत याप्रश्नी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन विखे पाटील यांनी विधानसभेत दिले. आरेतील गणेश विसर्जन तलावातील गाळ काढणे व सुशोभिकरणासाठीचा सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार का?, असा प्रश्न आमदार वायकर यांनी उपस्थित करताच याप्रश्नी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन विखे पाटील यांनी विधानसभेत दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"