मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी १३व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज संपले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्द्यांवर विरोधकांचा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजीला सुरूवात केली. मात्र, या गदारोळातच सभापतींनी पुढील कामकाज पुकारले. विरोधकांच्या गदारोळात अवघ्या १३ व्या मिनिटाला दिवसभराचे कामकाज उरकले गेले.
वंदे मातरम् ने दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची सूचना दिली होती. महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन मांडण्याचा प्रयत्न केला. यावर, शिवसेना सदस्य दिवाकर रावते यांनी हरकत घेतली. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. यापूर्वी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगन प्रस्ताव घेण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासानंतरच स्थगनच्या सूचना घ्याव्यात अशी मागणी केली. तर, गेली पाच वर्ष आम्ही सुद्धा हीच मागणी करत होतो.
मात्र, एका स्थगनवर चारचार सदस्य भाषणे ठोकत होते. त्या पाच वर्षात शिवाजीराव देशमुख यांच्या आदेशाचे पालन झालेले नाही. आता हीच नवा प्रथा बनली आहे. आम्ही विरोधात आलाओ म्हणून लगेच प्रथा बदलू नये, अशी मागणी भाजप सदस्य भाई गिरकर यांनी केली. यावर अनेक आदेशांचे पालन झाल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. काही बाबी होऊ शकल्या नसतील तर त्या तशाच चालू ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका मांडत सभापतींनी स्थगन प्रस्तावाच्या सूचना फेटाळून लावल्या.
यावर संतप्त झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. या गदारोळातच २०१९-२० च्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्र सभागृहासमोर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच कार्यक्रम पत्रिकेवरील सर्व कामकाज पुकारले गेले. अवघ्या १३ व्या मिनिटाला सर्व नियोजित कामकाज गदारोळात पूर्ण झाले आणि सभापतींनी दिवसभराचे कामकाज संपल्याची घोषणा करत कामकाज तहकूब केले.