मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टपूर्वी; गृह खाते भाजपकडेच राहणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:09 AM2022-08-08T06:09:04+5:302022-08-08T06:09:15+5:30
नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत.
नवी दिल्ली/मुंबई : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे यासाठी त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. यात गृहखाते भाजपकडेच राहील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला, परंतु ते कोण सांभाळणार याबद्दल त्यांनी पत्ते उघड केले नाही. मात्र गृहखाते आपल्याकडे राहणार या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.
नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांच्या अपात्रेसंदर्भात कोर्टात काही याचिकांची सुनावणी सुरू आहे. त्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडथळे येण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी खाते वाटप व आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रश्नांना उत्तरे दिली.
मंत्रिमंडळाचा विस्तार १५ ऑगस्टपूर्वी होईल, असा दावा केला. उद्धव ठाकरे सरकारसुद्धा काही मंत्र्यांच्या भरवशावर महिनाभर होते. यामुळे विकासकामे खोळंबलेली नाहीत, असे फडणवीस म्हणाले. राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. भाजपला यश मिळालेले नाही, असे मतदारसंघ मजबूत करण्याची रणनीती आखली आहे. यात बारामतीही आहे. याची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविली आहे. त्या लवकरच बारामतीचा दौरा करतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
लवकरच चित्र स्पष्ट होणार- मुख्यमंत्री
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे परंतु या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडथळे येण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारी होणार नसून येत्या १२ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या कामकाजामध्ये या याचिकेचा उल्लेख नाही. येत्या १२ ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सोमवारी नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले.