मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्यासह नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह 13 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागल्यामुळे ठाण्यात 'एकनिष्ठेचे फळ' असं लिहलेले बॅनर लावण्यात आले होते. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सगळं बघायला आई हवी होती अशी भावना व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आईचं दर्शन घेऊन माझ्या दिवसाची सुरुवात होते. आज मंत्रिपदाची शपथ घेताना मला बघायला आई हवी होती. आमच्या घरची परिस्थिती अगदी बिकट होती. आई अशिक्षित असताना देखील मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवलं व कोणतीही खासगी शिकवणी न लावता तिने स्वत: घरी माझी शिकवणी घेतली असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आईचं झाडूने मारलेलं आठवत असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांना आईबद्दलच्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी, काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे देखील मुंबईत दाखल झाले आहेत.
मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला असून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.