मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंचा पराभव करत आमदारकी मिळवली. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचा मंत्री व्हाया विधानपरिषद विरोधी पक्षनेता असा लांबलचक प्रवास मुडेंनी केला आहे. शपथविधीला जाण्यापूर्वी धनंजय यांनी आपल्या मातोश्रींचे पाया पडून दर्शन घेतले.
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. तर, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंनाही संधी देण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
आपले काका दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत राजकारणात आलेले धनंजय यांनी प्रत्येक संधीचे सोने करत आपले कर्तृत्व राज्याच्या राजकारणात सिद्ध केले आहे. वडिल पंडित अण्णा मुंडे आणि गोपीनाथ मुंडें यांना आदर्श मानून धनंजय यांचं राजकारण सुरू आहे. त्यामुळेच, दिवंगत पंडित अण्णा आणि गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन धनंजय यांनी अभिवादन केलं. दरम्यान, गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधीपक्ष नेता पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तत्कालीन सरकारला नेहमीच धारेवर धरले होते. त्यामुळे, धनंजय यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर बीडसह राज्यातील त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.