मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्येला जाण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळासह रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत आमदार, खासदार आणि तीनही पक्षांतील पदाधिकारीही अयोध्येला जाणार आहेत.
राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी निमंत्रण असूनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे टाळले. संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदारांसह अयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. एकाच विमानातून संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला पाेहोचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. सोबतच ते शरयू किनारी महाआरती करतील आणि हनुमानगढीचेही दर्शन घेणार असल्याचे समजते.
कार्यकर्ते आधीच पोहोचणारमंत्रिमंडळ पोहोचण्याआधीच शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अयोध्येला पोहोचणार आहेत. त्यामुळे अयोध्येतही दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाईल.