Maharashtra Cabinet Meeting: चक्रीवादळांच्या तडाख्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणार, ३ हजार कोटींची घोषणा; ठाकरे सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:22 PM2021-09-15T19:22:12+5:302021-09-15T19:23:43+5:30
Maharashtra Cabinet Meeting: तौत्के, निसर्ग चक्रीवादळांनी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Cabinet Meeting: तौत्के, निसर्ग चक्रीवादळांनी राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर केलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता वादळांमुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं ३ हजार कोटींची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीनं पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
अतिवृष्टी आणि चक्रीवादळांच्या तडाख्यामुळे राज्याला मोठं नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. अनेकांचे प्राण जातात, तर आर्थिक नुकसानही बरंच होत आहे. नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढल्यामुळे कोकवासीय देखील हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीही कायमस्वरुपी उपाय योजना करण्यासंदर्भातील सूतोवाच केलं होतं. त्याच दृष्टीकोनातून आता कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी सरकार प्रयत्नशील आहे.
ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार तातडीनं अध्यादेश काढणार असल्याचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय https://t.co/Ds9q8J9DIo
— Lokmat (@MiLOKMAT) September 15, 2021
"आंध्र प्रदेश, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षणासाठीचा अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला आहे. तसा अध्यादेश तातडीनं काढला जाणार आहे. यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठेवून अध्यादेश काढला जाईल", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.