Join us

फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 8:48 AM

नागपुरात महाआरती

मुंबई : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाता फेब्रुवारीत एकत्रित मंत्रिमंडळासह अयोध्याला जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे. मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन आम्ही घेणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण सत्ताधारी मंत्र्यांबरोबरच विरोधकांनाही देण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी सोहळ्याला न जाता नंतर दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे राममंदिरात महाआरती करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

तारीख लवकरच : मुख्यमंत्री शिंदे देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

योग्य निर्णय : अजित पवार मी आणि मुख्यमंत्री आजच अयोध्येला जाणार होतो. परंतु, काल मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. ते मला म्हणाले, कार्यक्रमाला केवळ आपण दोघेच न जाता काही दिवसांनी आपले संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाऊया. राज्याच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :राम मंदिरअयोध्याएकनाथ शिंदेअजित पवारदेवेंद्र फडणवीस