Join us

...तर महाराष्ट्रच देऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय - शरद पवार  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 1:53 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना महाराष्ट्रच पर्याय देऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना महाराष्ट्रच पर्याय देऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चेंबूर येथे विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन शनिवारी केले होते, त्यावेळी ते बोलत होते. मोदींना पर्याय काय ? असा प्रश्न नेहमीच सर्वजण विचारतात. मात्र, भाजपविरुद्द सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्रच मोदींना पर्याय देऊ शकतो, असेही पवार यांनी म्हटले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने विश्वासाने निवडून दिले होते. मात्र, त्या विश्वासास ते पात्र ठरले नाहीत. त्यांच्या काळात माणसा-माणसांमध्ये, दोन समाजामध्ये आणि राज्यांमध्येही एकवाक्यता राहिली नाही. समाजात जातीय तेढ निर्माण झाला आहे. जनतेचा पूर्ण भ्रमनिरास करण्याचे काम मोदींनी केले, असेही पवार यांनी यावेळी म्हटले. तसेच मोदींना पर्याय काय, हा प्रश्‍न नेहमीच विचारला जातो. पण, एका दिवसात कोणताही पर्याय उभा राहत नाही. मात्र, भाजपविरोधातील सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्र हा पर्याय देऊ शकतो, असेही पवार म्हणाले. 

गोमांसच्या संशयावरून ‘मॉब लिंचिंग’चे प्रकार घडत असून, ही अत्यंत चिंताजनक आणि निंदनिय गोष्ट आहे. दादरीमध्ये काही वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. एका व्यक्तीच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरून जमावाच्या मारहाणीत त्यास आपला जीव गमवावा लागला. मात्र, ते गोमांस नव्हतेच असे चौकशीच्या अहवालात समोर आले होते. आता, त्या व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी कोणाची? असा सवालही पवार यांनी विचारला आहे.

टॅग्स :शरद पवारनरेंद्र मोदीराजकारणमहाराष्ट्र