Manohar Joshi News मनोहर जोशी यांच्या निधनावर CM शिंदेंनी व्यक्त केला शोक; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:25 AM2024-02-23T10:25:16+5:302024-02-23T10:42:09+5:30
Maharashtra Chief Minister Eknath Shinde And Former CM Uddhav Thackeray has also paid tribute to Manohar Joshi. शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी) निधन झाले.
Manohar Joshi Shivsena: शिवसेनेचे पहिले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (२३ फेब्रुवारी) निधन झाले. पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. 'महाराष्ट्र भूषण' या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण #श्रद्धांजली… pic.twitter.com/NZFrtPZUSa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 23, 2024
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मनोहर जोशी यांचं निधन दुदैवी घटना आहे. मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री होते. लोकसभेचे सभासद होते. पण त्यापेक्षाही ते एक सच्चे शिवसैनिक होते. कोणत्याही पक्षाच्या किंवा आयुष्याच्या जीवनात चढ-उतार येत असतात. संकटाच्या काळात देखील ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहिले. ज्यावेळी शिवसेनाप्रमुखांना बेळगाव आंदोलनादरम्यान अटक झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ता साळवी हे देखील होते. जीवाला जीव देणारे शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे दुदैव आहे. मी बुलढाण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन लवकरात लवकर मुंबईला पोहचण्याचा प्रयत्न करतोय, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मनोहर जोशींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती आहे.
मनोहर जोशींची कारकीर्द
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. आजारपणामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते.