सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 03:54 PM2023-02-01T15:54:00+5:302023-02-01T15:54:44+5:30
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: 2023-24 या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. दरम्यान, वित्तमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामधून प्राप्तीकर भरणाऱ्या करदात्यांना खूशखबर दिली आहे. वित्तमंत्र्यांनी प्राप्तिकराची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. निर्मला सीतारामन यांनी आज संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेनुसार अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा मिळाला आहे, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा हा अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचे मी मनापासून स्वागत करतो. #Budget2023
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2023
दरम्यान, सीनिअर सिटीझन अकाऊंट स्कीमची मर्यादा साडेचार लाखांवरून वाढवून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिक या स्कीममध्ये कमाल 4.5 लाखांऐवजी 9 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. याशिवाय संयुक्त खात्यात कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा वाढवून ती 15 लाख रुपये करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
बजेटमध्ये काय महाग आणि काय स्वस्त
- खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल्स स्वस्त होतील
- इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील
- परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू महागणार
- देश स्वयंपाकघर चिमणी महाग होईल
- मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स स्वस्त होतील
- सिगारेट महागणार
महिलांसाठी काय?
याशिवाय अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी घोषणा करताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महिला सन्मान बचत पत्राची घोषणा करण्यात येत असून त्याच्यासाठी नवीन बचत योजना येणार आहे. त्यात 2 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल, ज्यावर 7.5 टक्के व्याज दिले जाईल. कोणतीही महिला किंवा मुलगी खाते उघडू शकेल, पण त्यातून पैसे काढण्याच्या अटी असतील. या अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणासाठी उचलले जाणारे हे मोठे पाऊल आहे.