राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करत जनतेला पुन्हा एकदा कठोर नियमांचं पालन करावं लागणार असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून लॉकडाऊन करायचा की नाही? याचा निर्णय या आठवड्यातील परिस्थितीपाहून घ्यावा लागेल, असा अल्टिमेटम उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. (Maharashtra Lockdown CM Uddhav thackeray Live)
'कोरोनाची दुसरी लाट दरवाज्यावर धडका मारतेय, जिल्हाधिकाऱ्यांना मी आदेश दिलेत'
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवत लॉकडाऊन करायचा का की नाही? असा जनतेला प्रश्न विचारला. लॉकडाऊन नको असेल तर कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अतिशय महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढील आठ दिवस राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीपाहून लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर विनामास्क फिरणं, गर्दी करणं, सुरक्षित अंतर न ठेवणं, विनाकारण बाहेर पडणं हे टाळावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कठोर बंधनं घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशराज्यात काही ठराविक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना जिथं जिथं वाटतं तिथं बंधन घालण्याचे आदेश दिले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण असं करताना अचानक लॉकडाउन घोषीत करू नका, जनतेला चोवीस तासांचा वेळ द्या, अशाही सूचना दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईला कोरोनाचा विळखामुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत आज गेल्या २४ तासांमध्ये ९२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यानं पुन्हा एकदा गाठला उच्चांकराज्यात एका दिवसात ६९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती देताना उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. "कोरोना कमी होतोय म्हणून आपण सारंकाही हळूहळू सुरू करत असताना आता राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून आपल्याला कठोर नियमांना सामोरं जावं लागणार आहे", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात गेल्या २४ तासांत ६९७१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.