मुंबई : आषाढ संपत असताना संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी पूर आला आहे. धरणांंमधील साठ्यात समाधानकारक वाढ होत असून खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या आठवड्यात राज्यात सर्वदूर दमदार पाऊस होईल, अशी आनंदवार्ता हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
दक्षिण राजस्थान ते ओडिशाच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राजस्थानपासून मध्य प्रदेश, ओडिशापर्यंत सध्या जोरदार पाऊस पडत आहे़ त्याचा फायदा पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या विदर्भालाही होऊ लागला आहे. अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार असून मेळघाट जलमय होऊन २७ गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली, गोंदिया, जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. गडचिरोलीतील ग्रामाण भागातील अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे. वºहाडातील बुलढाणा येथे चांगला पाऊस झाला असला तरी वाशीम आणि अकोला जिल्हे प्रतिक्षेत आहेत. मराठवाड्यात परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. परभणीतील नद्या दुधडी वाहू लागल्या आहेत. बीड, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे मात्र अजूनही पावसाची वाट पाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली येथे दमदार पाऊस कोसळला. कोल्हापुरातील गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. ३२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कºहाड येथील विद्यानगरला जोडणारा कृष्णा नदीवरील जुना पूल सोमवारी दुपारी कोसळला. या मार्गावरील वाहतूक पंधरा दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
कोकणात पुन्हा पूरस्थिती, महामार्ग बंदकोकणात संततधार कायम असल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, दापोली आणि रत्नागिरीत पुन्हा पावसाचा जोर वाढला असून खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरीतील चांदेराई येथेही पुराची शक्यता निर्माण झाली आहे. दापोली तालुक्यात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने वाहतूक बंद झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथेही बाजारपेठेत पाणी घुसले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २३० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.नाशिक जिल्ह्यात अक्षरक्ष: धो...धो पाऊस कोसळत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,पेठ तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली. भावली धरणानंतर भाम धरण पूर्ण भरले आहे. पाठोपाठ इतरही सर्व धरणे भरण्याकडे वाटचाल करीत आहे. भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गोदावरीला पूर आला आहे. खान्देशातही पाऊस बरसत आहे. जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात जोर असून तापी नदीला पूर आहे. हतनूर धरणाचे ३६ दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे.
भंडारदऱ्यात दाट धुकेनाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-घोटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने धरण क्षेत्रात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतआहे. त्यातच भंडारदरा धरण परिसरातील धबधबे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहेत. परंतु पावसामुळे कोकणकडी, घाटघर भागात मोठ्या प्रमाणावर धुके दाटून येत असल्याने वाहनचालकांनी उडरावणे येथूनच माघारी फिरावे, असे आवाहन भंडारदरा वन्यजीव विभागाने केले आहे.
मुंबईतही जोर कायममुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर सोमवारीदेखील कायम होता. मुंबई, नवी मुंबईत जोरधार सरी बरसल्या. लोकल, रेल्वे, रस्ते तसचे हवाई वाहतूक सुरळीत होती.अनेक धरणांतून विसर्गकोयना धरणांत २४ तासांत ४.५७ टीएमसीने वाढ होऊन एकूण पाणीसाठा ६७.८७ झाला आहे. धरण ६५ टक्के भरले आहे. वारणा ७६ टक्के भरले आहे. राधानगरी धरण ८६ टक्के भरले असून विसर्ग सुरू आहे. पुण्यातील धरणांमधून पाणी झेपावू लागल्याने उजनीतही साठा वाढत आहे. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरण ७५ टक्के भरले असून विसर्ग सुरू झाल्याने जायकवाडी धरणांतील साठा वाढेल. जळगावच्या हतनूर धरणाच्या ३६ दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे.