सीएएविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:09 AM2020-01-17T02:09:07+5:302020-01-17T06:46:42+5:30
देशात एनआरसी आणि सीएएविरोधात रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. २७ लाख कोटी इतका महसूल गोळा होणे अपेक्षित होते.
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणिं ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सरकार मनमानी पद्धतीने आपला कार्यक्रम रेटत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.
दादर येथील आंबेडकर भवनात आज विविध संघटनांचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएए आणि एनआरसीविरोधात महाराष्ट्रात ज्या ज्या संघटनांनी आंदोलन केले त्या सर्वांना आजच्या बैठकीत बोलावण्यात आले होते. ३० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बंदला लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले.
देशात एनआरसी आणि सीएएविरोधात रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. २७ लाख कोटी इतका महसूल गोळा होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ११ लाख कोटीच जमा झाल्याचा अहवाल आला आहे. उरलेला निधी कसा जमा होईल हा प्रश्न आहे. जीएसटी, नोटाबंदी आणि अविश्वासाच्या वातावरणामुळे सरकारकडे निधी येत नाही. देशाची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.