Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 400 शेतकऱ्यांना निमंत्रण; शिवाजी पार्कवर जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:59 PM2019-11-27T16:59:14+5:302019-11-27T16:59:58+5:30
Maharashtra News: तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आली नाही.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरोधी महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून या सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. हे सरकार माझं सरकार असेल अन् सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले होतं. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शेतकऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे.
दरम्यान ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने ठाकरे कुटुंब या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील असं सांगितलं आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनाही उद्धव ठाकरेंनी निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. त्याचसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचसोबत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रॅपिड एक्शन फोर्स, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथक आदिसह 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अन्य काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट करण्यात आली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथिगृहावर पार पडत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळावर चर्चा करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. या शपथविधी सोहळ्याला शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर हजेरी लावणार आहे. त्यामुळे अतिशय भव्यदिव्य आणि ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा पार पडेल असं शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.