मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान भाजपाने महाविकासआघाडीला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी रात्री अचानकपणे भाजपाला पाठिंबा देत राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदारही त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र या आमदारांना अशाप्रकारे काही होणार आहे याची कल्पनाही देण्यात आली नव्हती, त्यामुळे हे आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले अन् त्यांना घटनाक्रम सांगितला. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी या आमदारांना बोलण्याची संधी दिली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. सकाळी साडेसहा राज्यपाल इतका मोठा निर्णय घेतात हे आम्ही पहिल्यांदा पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य अजित पवारांसोबत गेले असं सांगण्यात आलं. मात्र हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ सदस्य असो वा कार्यकर्ता तो भाजपासोबत सत्ता बनविण्यासाठी तयार नाही अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
तसेच जे सदस्य गेलेत किंवा जाणार असतील त्यांना २ गोष्टी आठवण करुन देतो. पक्षांतर बंदीच्या कायदा देशात आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं. महाराष्ट्रातील जनमानस हा भाजपाविरोधी आहे. सत्तेविरोधात जनमत असताना अशा व्यक्तींच्या विरोधात मतदारसंघातील सामान्य माणूस कदापि उभा राहणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून त्या व्यक्तींविरोधात उमेदवार देऊ, अन् जे फुटले आहेत त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, आम्हाला ७ वाजता फोन आला, मी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो, ८-१० आमदार त्याठिकाणी जमा होते. तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं. राज्यपाल निवासस्थानी जाताना आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आले. राज्यपाल उपस्थित झाले अन् धक्कादायकपणे शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर आम्ही ताबडतोब शरद पवारांच्या निवासस्थानी गेलो, त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला, आम्ही राष्ट्रवादीसोबतच आहोत. आम्हाला अज्ञात ठेऊन हे सगळं करण्यात आलं असा आरोप त्यांनी केला. तसेच अजितदादांनी फोन केला, राजभवनात जाईपर्यंत आम्हाला काहीही कल्पना दिली नाही, यानंतर आम्ही शरद पवारांसोबत आहोत असं बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.