मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालून घेतली. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना शपथविधी सोहळ्याला घेऊन गेले होते. मात्र या आमदारांना फसवून राजभवनावर घेऊन गेल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती. आमच्याकडे शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ व काँग्रेसचे ४४ अशी १५४ ही आमदारांची संख्या अधिक तिन्ही पक्षांचे सहभागी व पाठिंबा दिलेले आणखी काही अपक्ष सभासद मिळून ही संख्या १६९-७० च्या आसपास जात आहे असं त्यांनी सांगितले.
मात्र हा जो काही निर्णय अजित पवार यांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. एकाप्रकारे हा शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र अशा प्रकारचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचा सभासद असो किंवा राज्यात काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो. जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी राहणार नाही याचा विश्वास शरद पवारांनी देत अजित पवारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
याबाबत राष्ट्रवादी आमदारांच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या भेटीला मुंबईतील निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे बैठकीपूर्वी अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आपल्या देशात पक्षांतरबंदी कायदा आहे. या कायद्याच्या तरतुदी बाहेर पडणाऱ्या सदस्यांना लागू होतात. त्यांचं सदस्यत्व जाण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात जनमत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही. सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले आहेत.