मुंबई - राज्यातील राजकारणात मोठी भूकंप झाला आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाचे नेते अजित पवार यांनी रात्री उशिरा भाजपासोबत हातमिळवणी करुन सत्तेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत ८ आमदार शपथविधीला उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शपथ दिली. मात्र या संपूर्ण नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात उभी फूट पडल्याचं दिसून आलं.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी ७ वाजता हे पाप भाजपाने केलं. अजित पवारांसोबत गेलेले ८ आमदारांपैकी ५ आमदार पुन्हा परतले आहेत. त्यांना खोटं सांगण्यात आलं. गाडीत बसवून अपहरण केल्यासारखं वागविलं. जर भाजपात हिंमत असेल तर विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवावं असं आवाहन संजय राऊतांनी दिलं आहे.
तसेच धनंजय मुंडे यांच्यासोबत संपर्क झाला आहे. अजित पवार पुन्हा परतण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांना ब्लॅकमेल केल्याची मला खात्री आहे. अजित पवारांना ब्लॅकमेल केलं गेलं, या सर्व घडामोडीमागे काय घडलं याचा गौप्यस्फोट लवकरच सामना वृत्तपत्रातून करु, त्याचसोबत अजित पवार पुन्हा परत येऊ शकतात अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपाला इशारा दिला आहे.
दरम्यान, प्रत्येक पक्षाने निर्वाचित आमदारांची सही घेऊन त्यांची यादी गटनेत्यांकडे ठेवल्या होत्या. यातील यादी विधिमंडळ नेते म्हणून अजित पवारांनी यादी घेतली. यातील २ यादी कार्यालयातून घेऊन अजित पवार कदाचित भाजपाला पाठिंबा देण्यासाठी गेले असावेत, ५४ आमदारांचा पाठिंबा आहे असं भासविण्यात आलं. राज्यपालांचीही फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
त्याचसोबत भाजपाला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून बहुमत सिद्ध करु, शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल, आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहणार, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ४ वाजता होणार आहे. त्यात नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे असं शरद पवारांनी सांगितले.