मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल उद्या संध्याकाळी ५ पर्यंत विधानसभेत बहुमत चाचणीदरम्यान लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे सध्या शरद पवारांकडून सगळी सूत्रं हाती घेतली आहेत. अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी नेत्यांकडून केले गेले. मात्र अजित पवारांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला.
पुतण्याच्या बंडामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत पवार कुटुंबात फूट पडत असल्याचं दिसून येत असल्याने शरद पवारांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सोमवारी रात्री महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे शक्तीप्रदर्शन केल्यानंतर अजित पवारांशी संपर्क साधला गेल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या सूत्रांनुसार अजित पवार संपर्कात असून त्यांचे बंड शांत करण्यात यश येईल असं सागण्यात येत आहे. अजित पवारांच्या गटालासोबत घेऊन भाजपाने राज्यात सरकार स्थापन केले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधिमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. जयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याबाबत राज्यपालांना आणि विधान मंडळाला कळविण्यात आलं आहे. तरीही अजित पवारांनी मनधरणी करण्याचे काम शेवटपर्यंत कुटुंबाकडून केलं जात आहे.
सांगितलं जात आहे की, शरद पवार यांची पत्नी प्रतिभा पवार यांनी अजित पवारांना समजविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पक्षासोबत कुटुंबातील गृहकलह टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्नशील आहेत. त्याच कारणाने अजित पवारांबद्दल कोणतीही टीकात्मक भूमिका नेत्यांनी घेतली नाही. सोमवारी विधान भवनात रामराजे निंबाळकर यांच्या कार्यालयातही अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जवळपास ३-४ तास चर्चा झाली. यानंतर चर्चेनंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार न स्वीकारताच त्यांच्या चर्चेगेटच्या निवासस्थानी गेले. तसेच मंत्रालयात शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारील खुर्ची रिक्त असल्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे शासकीय कामात अजित पवारांची अनुपस्थिती नेमकी कोणत्या कारणासाठी आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी राज्यात वेगवान घडामोडी घडतील पण विधिमंडळाच्या सभागृहात बाजी कोण मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.