मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात केलेलं बंड शनिवारी दिवसभर चर्चेचा विषय बनलं होतं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीसोबत हा पवार कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जातो. अजित पवारांनी काका शरद पवारांशी फारकत घेत भाजपाशी घरोबा केला. त्यामुळे कुटुंबात आणि पक्षात उभी फूट पडली आहे. मात्र अजितदादांच्या या निर्णयामुळे बहिण सुप्रिया सुळेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
आज सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसला एक पोस्ट केलं आहे. त्यात शरद पवारांचा साताऱ्यातील पावसात केलेल्या भाषणाचा फोटो टाकला आहे, यात लिहिलं आहे की, हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल. त्याचसोबत यापुढे पुन्हा मजबूत संघटनेची पुनर्बांधणी करून लोकांची सेवा करू, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट आदर्श नेतृत्व आहे, आम्ही प्रामाणिकपणे आणि सन्मानाने, मेहनतीने पुढे जाऊ असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
शनिवारी झालेल्या सत्तानाट्यावरही त्यांनी भाष्य केलं होतं. एरवी ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या सुप्रियांनी व्हॉट्सअप स्टेट्सवर 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत’ अशी माहिती दिली तर त्यानंतर काही वेळातच ‘विश्वास नेमका ठेवायचा कुणावर?’, असे भावनिक स्टेट्स ठेवले होते. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण-भावाचे खूप आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. सिंचन घोटाळा असो की, राज्य शिखर बँक प्रकरणी आलेली ईडीची नोटीस असो अशा प्रत्येक प्रसंगी सुप्रिया यांनी अजित पवारांची पाठराखण केलेली आहे. शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. ते काही काळ अज्ञातवासातही गेले होते. त्यावेळीही सुप्रियांनी अजितदादांचीच बाजू घेतली होती. मात्र, शरद पवार आणि पक्षाला अंधारात ठेऊन अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना धक्का बसल्याचे दिसून आले.
रोहित पवार आजोबांसोबतशरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे आजोबासोबत असल्याचे दिसते. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेला उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात मतभेद झाले होते. त्यावेळीही रोहित यांनी आजोबांचीच बाजू घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात रोहित पवारांनी फेसबुक प्रोफाईल फोटो बदलून महाराष्ट्राचा लोकनेता शरद पवार असं लिहिलं होतं.