मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात महाविकासआघाडीच्या आमदारांना एकत्र करत पक्षाची निष्ठा बाळगेन अशाप्रकारची शपथ देण्यात आली मात्र या ओळख परेड कार्यक्रमावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ओळख परेड आरोपींची केली जाते आणि आपल्याच आमदारांना आरोपी समजणं हा आमदारांचा, लोकशाहीचा अन् मतदारांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली.
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल आणि पाच वर्ष टिकेल, ओळख परेडनं आमदारांचा आत्मविश्वास पुन्हा आणण्याचा हा प्रयत्न आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मविश्वास गमावला आहे, उपस्थित आमदारांची संख्या 145 तरी होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवानं आदित्य ठाकरेनं सोनिया गांधीजींच्या नेतृत्वाची शपथ घेतली, सत्ता येते, सत्ता जाते, शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आहे हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं, मराठी माणसालाही दुख: झालं असेल. आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाची शपथ घेणं शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठी सर्वात लज्जास्पद बाब आहे असा टोला आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला. त्याचसोबत या तीन पक्षाचा पोरखेळ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, ओळख परेडमुळे विधानसभेचं संख्याबळ सिद्ध होत नाही, गमावलेला आत्मविश्वास वाढवण्याचा टुकार प्रयत्न केला आहे. त्यामुळे फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा मात्र या शर्यतीची फोटोफिनीश देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हेच करतील असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षात दूर करण्याचा, अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना पक्षाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही, घटनातज्ज्ञ, संसदेतील दिग्गज तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, जे अशा गोष्टी करतायेत ते संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. याबाबत नवीन आमदारांनी निश्चिंत राहा असं त्यांनी सांगितले.