मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेमध्ये भाजपाने शिवसेनेसोबत राष्ट्रवादीलाही मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांसोबत अवघे ४-५ आमदार गेले असून त्यातीलही काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परततील असा आशावाद संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
मात्र पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि पोलीस या ४ कार्यकर्त्यांच्या बळावर दबाव आणण्याचं, ब्लॅकमेलिंग करण्याचं काम करतं. अजित पवारांना ५ आमदारांच्या बळावर उपमुख्यमंत्रिपद दिलं, भाजपाला आम्ही व्यापारी समजत होता पण कालचा व्यापार चुकला. व्यापार प्रामाणिक केला असता तर भाजपावर ही वेळ आली नसती. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार सर्व सुरक्षित आहेत. आमच्या तीन पक्षाकडे १६५ आमदारांचे संख्याबळ आहे. आधी १७० आकडा सांगितला होता आता १६५ आमदारांचा संख्याबळ आमच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले असं त्यांनी सांगितले.
तसेच शनिवारी जे घडलं तो देशाच्या इतिहासात काळा दिवस आम्ही पाहिला नाही, राष्ट्रपती भवन, राजभवनाचाही काळाबाजार भाजपाने केला. इंदिरा गांधी यांच्यावर आणीबाणी आणली त्यापेक्षाही वाईट दिवस भाजपाने आणला आहे. बहुमत होतं तर लपून-छपून शपथविधी का घेतला? राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतो ते राज्यातील जनतेलाही माहित पडत नाही असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, राज्यपाल ज्यांच्या नावात भगवान शब्द आहे, जे आम्हाला एक न्याय देतात अन् भाजपाला वेगळा न्याय देतात. शिवसेना, राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली जाते, भाजपाला २४ तासात बहुमत सिद्ध करावं असं न सांगता मग ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत का दिली? नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा देण्याचा काम त्यांच्याच पक्षाचे लोक करत आहेत अशी नाराजी संजय राऊतांनी व्यक्त केली. त्याचसोबत पुढील १० मिनिटात जरी राज्यपालांनी आम्हाला बोलाविले तरी बहुमताचा आकडा आम्ही तीन पक्ष सिद्ध करू शकतो, अजित पवारांनी आमदारांना फसविले, जे आमदार गायब आहेत तेदेखील पुन्हा पक्षात परततील असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
भाजपाच्या अंताची सुरुवात झाली आहे. भाजपाचा हा शेवटचा डाव आहे त्यात ती फसली आहे. संजय राऊत हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, धमकविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मी घाबरणार नाही असा इशारा त्यांनी दिला. ज्या कोणाला मला उत्तर द्यायचं आहे त्यांनी मला उत्तर द्यावं.