Join us

Maharashtra CM: मुख्यमंत्र्यांच्या बाजूची खुर्ची रिकामी; उपमुख्यमंत्री अजित पवार गेले कुठे?  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 7:34 PM

Maharashtra News - राज्यात स्थिर सरकार यावं यासाठी अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा दिला

मुंबई - भाजपाने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात जावून पदभार स्वीकारला तर अजित पवार यांनी अद्याप उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाही. इतकचं नव्हे तर राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला ठेवण्यात आलेली खुर्ची रिक्त होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गेले कुठे? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

राज्यात स्थिर सरकार यावं यासाठी अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा दिला. रातोरात राष्ट्रपती राजवट हटवून राज्यात भाजपाचं सरकार स्थापन झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांचे पाठिंबा पत्र विधिमंडळ नेते म्हणून अजित पवारांनी राज्यपालांना सादर केलं. मात्र भाजपाला पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला नाही, अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केल्यानंतर अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा सुरु झाली. अजित पवारांसोबत किती आमदार गेले आणि परतले याबाबत स्पष्टता नसली तरी अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. 

 

सोमवारी सकाळी विधानभवनात रामराजे निंबाळकर यांच्या कार्यालयात अजित पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यात ३ ते ४ तास चर्चा झाली. छगन भुजबळ-वळसे पाटील यांच्याकडून अजित पवारांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु होता. याबाबतीत कोणतेही नेते ठोसपणे सांगत नसले तरी अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे याची भूमिका अद्यापही स्पष्ट झाली नाही. 

दरम्यान या सर्व घडामोडी रात्री घडल्यामुळे स्थापन झालेलं सरकार देखील रात्रीच पडणार असल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेते जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. 

 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसदेवेंद्र फडणवीसभाजपा