मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना अचानक राज्यात नाट्यमय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. रात्री उशिरा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा असलेल्या आमदारांचे पत्र राज्यपालांना दिलं.
राज्यात अचानक घडलेल्या या सत्तेच्या नाट्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे इतके दिवस भाजपा नेते वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे १०-१२ आमदार शपथविधीला उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याने भाजपाने राज्यात सत्तास्थापन केली आहे.
मात्र या संपूर्ण घडामोडीमध्ये शरद पवारांनी ट्विट करुन अजित पवारांनी घेतलेला हा राजकीय निर्णय वैयक्तिक असून त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा याला पाठिंबा नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
दरम्यान, 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत' असं भावनिक ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलं. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर मी मीडियाशी नक्की बोलेन,' असं त्यांनी सांगितलं आहे.
तसेच शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.