निवडणूक जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधीच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी भेट; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:51 PM2024-10-15T16:51:23+5:302024-10-15T17:11:20+5:30

निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली.

Maharashtra CM Eknath Shinde announced Diwali bonus for BMC employees | निवडणूक जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधीच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी भेट; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

निवडणूक जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधीच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी भेट; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

Diwali Bonus : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर करण्याच्या काही मिनिटांआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपयांचा बोनसही जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम तीन हजार रुपये अधिक आहे. बालवाडी शिक्षक आणि आशा वर्कर्स यांनाही बोनस मिळणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्रात २८८ विधानसभा जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना २८,००० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला. खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल मजदूर संघाने बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना ४०,००० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांना एक्स-ग्रॅशिया बोनस देण्याची विनंती युनियनने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली होती. गेल्या वर्षी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ नोव्हेंबर रोजी बीएमसी कर्मचाऱ्यांना २६,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला होता. मात्र यावेळी गेल्या वर्षीपेक्षा अधिक बोनस कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, सरकारने पात्र महिलांना ३,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी लाडकी बहीण योजनेंतर्गत दिवाळी बोनस २०२४ जाहीर केला होता.  लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस २०२४ उपक्रमाद्वारे चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे, सरकारने जाहीर केले आहे.

दरम्यान, राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असणार आहे. तर उमेदवारी अर्ज पडताळणी ३० ऑक्टोबर पर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर असणार आहे. तर मतदानाची तारीख २० आणि मतमोजणीची तारीख २३ नोव्हेंबर असणार आहे.

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde announced Diwali bonus for BMC employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.