मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... असे म्हणत फडणवीस यांनी आपला शब्द खरा खरुन दाखवला. त्यानंतर फडणवीसांना केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी तशाच अंदाजमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी मी पुन्हा येईन... असे विधान केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत महाविकासआघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं होतं. तसेच, फडणवीसांना आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं गणित आखलं होतं. पण, अजित पवारांच्या फुटीरतावादी खेळीनं पवारांच गणित बिघडलंय. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर, राज्य आणि देशपातळीतून फडणवीसांचं अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच देवेंद्रांचं अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फडणवीस यांना स्मृती इराणींनी त्यांच्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या वाक्यावरुन फडणवीसांना ट्रोल करण्यात आलं, त्याच वाक्याचा फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर करून इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलंय. तसेच, मी पुन्हा आलो... असे ट्विटही त्यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटला रिट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी स्मृती इराणींचे आभार मानले आहेत.