मुंबई : आयुष्य हे एक रंगभूमी आहे. मी नशिबानं इथे आलोय आणि मायबाप जनतेनं मला इथे बसवलंय. ‘मी येईन’, असं कधीही म्हणालो नव्हतो तरी मला यावं लागलं. तुम्ही माझ्यासोबत असता तर आज मी घरी बसून टीव्हीवर हे कामकाज पाहिलं असतं, असे चिमटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विधानसभेत माजी मुख्यमंत्री आणि नवे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढले.फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अभिनंदन करतानाच त्यांनी निवडणूक निकालापासून भाजपबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. फडणवीस यांचा त्यांनी मित्र म्हणून उल्लेखकेला. समोर तुमच्यासारखे मित्र आहेत. हो! तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवून ठेवलेली नाही आणि त्यात अंतरही पडणार नाही,मी गेल्या पाच वर्षांत तुमच्याकडून खूप शिकलो, या ठाकरे यांच्या विधानाने गेल्या महिनाभरातीलकटूता विसरून राज्यहितासाठी विरोधी पक्षाशी चांगले संबंध ठेवण्याची त्यांची मानसिकता असल्याचे दिसले.तुमच्यासोबत होतो तेव्हा मी कधीही दगा दिला नाही. चांगल्या कामांआड आलो नाही आणि कटकारस्थानही केलं नाही. मी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सांगितले होते की, काळोखात काही करायचे नाही. मध्यरात्री खलबतं करायची नाहीत, असे सांगत ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून सकाळीच सरकार स्थापन केल्याबद्दलही चिमटे काढले.मला शेतकऱ्यांचा सातबाराच कोरा करायचा नाही, त्यांना केवळ कर्जमुक्त करायचे नाही तर चिंतामुक्तदेखील करायचे आहे. निसर्गाचा लहरीपणा, सरकारमध्ये कोण, विरोधात कोण याच्या महिन्याभरातील लहरीचे तडाखे सर्वांनाच बसले आहेत.आज आपण एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी आलो नसून त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे आणि त्यासाठी रात्रीही बसावे लागले तर आपली तयारी असेल, असे ठाकरे म्हणाले. ‘मी आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही, आपणएका जबाबदार पक्षाचे नेते आहात मी आपल्याला विरोधक मानत नाही, अशी साद त्यांनी फडणवीस यांना घातली.‘हिंदुत्व कधीही सोडणार नाही’आमचे हिंदुत्व कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील, पण आमच्या हिंदुत्वात शब्द पाळणं येतं. जय श्रीराम म्हणायचं अन् दिलेलं वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही, अशी कोपरखळी ठाकरे यांनी भाजपला मारली.
मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो!, उद्धव ठाकरेंनी अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीसांना काढले चिमटे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 5:31 AM