मुंबई - राज्यातील सत्तास्थापने भाजपाकडून मोठा भूकंप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन समर्थक आमदारांचा भाजपाला पाठिंबा दिला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे.
सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मुंबईतील त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबदेखील उपस्थित आहे. अजित पवारांचे समर्थक या इमारतीबाहेर होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता अजित पवारांनी मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार अशा शब्दात भूमिका मांडली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना डावलण्यात येत होतं का? या अशा अनेक प्रश्नांना उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाबाबत शरद पवारांनाही कोणतीही कल्पना नव्हती. अजित पवारांचा हा निर्णय वैयक्तिक होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय नाही. मात्र अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष निर्माण झाला आहे. अजित पवारांविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहे. ठाणे, मुंबई परिसरात अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. बारामतीत शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत पवार कुटुंबातील कलह उघड झाला आहे.
काही वेळापूर्वी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. सकाळी साडेसहा राज्यपाल इतका मोठा निर्णय घेतात हे आम्ही पहिल्यांदा पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य अजित पवारांसोबत गेले असं सांगण्यात आलं. मात्र हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ सदस्य असो वा कार्यकर्ता तो भाजपासोबत सत्ता बनविण्यासाठी तयार नाही अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.