मुंबई - राज्यातील सत्तास्थापने भाजपाने खेळलेल्या खेळीमुळे महाविकासआघाडीची चर्चा करणाऱ्या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेत भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदारअजित पवारांच्यासोबत आहे याची संख्या सध्यातरी स्पष्ट नाही.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सांगितले होते की, बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे. मात्र नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं होतं.
त्यामुळे अजित पवारांनी केलेलं हे वक्तव्य सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये त्यांनाच लागू होतं का हे आगामी काळात कळणार आहे. अजित पवारांसोबत ८ आमदार गेले होते मात्र त्यातील ५ आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतल्याचं सांगण्यात आलं. तर अजित पवारांना ब्लॅकमेल केलं गेलं त्याची खात्री आहे. याबाबत गौप्यस्फोट सामनातून करण्यात येईल असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनीही ही भूमिका मांडली. पवार म्हणाले की, जे सदस्य अजित पवारांसोबत गेलेत किंवा जाणार असतील त्यांना २ गोष्टी आठवण करुन देतो. पक्षांतर बंदीच्या कायदा देशात आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं. महाराष्ट्रातील जनमानस हा भाजपाविरोधी आहे. सत्तेविरोधात जनमत असताना अशा व्यक्तींच्या विरोधात मतदारसंघातील सामान्य माणूस कदापि उभा राहणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून त्या व्यक्तींविरोधात उमेदवार देऊ, अन् जे फुटले आहेत त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
होय, आम्ही अजित पवारांसोबत; 'या' आमदाराने दिली लोकमतला प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटील, तोंड सांभाळून बोला; संजय राऊत भडकले
आम्ही ८० वर्षाच्या ' योध्या' सोबत बारामतीत लागले फलक
'मला आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीनं भूमिका मांडणार'
'अजित पवारांनी आमदारांना फसविले; जे गेले ते पुन्हा आलेत अन् परतले नाहीत त्यांनी याद राखा'