मुंबई - सत्तास्थापनेच्या संघर्षात राष्ट्रवादी विधिमंडळ नेते असलेले अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवारांना याबाबतीत कोणतीच कल्पना न देता अजित पवारांनी ही खेळी खेळली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सर्व अधिकार जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र आमदार अजित पवार यांची गटनेते पदी केलेली निवड ही वैध आहे. आमदार जयंत पाटील यांची निवड राष्ट्रवादीने केली ती अवैध ठरते, कारण आज संपूर्ण कोरममध्ये ही निवड झालेली नाही असं भाजपाचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
याबाबत बोलताना अॅड. आशिष शेलार म्हणाले की, राज्यपालांकडे दि. 30 ऑक्टोबर २०१९ चे जे पत्र राष्ट्रवादीने दिले होते. त्यामध्ये आमदार अजित पवार हे गटनेते आहेत.नव्याने जयंत पाटील यांची जी निवड केली त्याचे साधे पत्रही अद्याप राज्यपालांकडे पाठवलेले नाही. तसेच सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये आमदार अजित पवार यांच्या नेता निवडीला आव्हान देण्यात आलेले नाही. त्याचा साधा उल्लेखही राष्ट्रवादीने या पत्रात केलेला नाही असं शेलारांनी निर्दशनास आणून दिलं आहे.
तसेच संपूर्ण कोरम असताना राष्ट्रवादीने जो निर्णय घेतला तो आज पूर्ण कोरम नसताना बदलला आहे तो वैध आहे की नाही याची शहानिशा स्वतः राज्यपाल करतील. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. त्याचे राजकारण करीत आहे. अजित पवार यांची नेतेपदाची निवड ही वैध ठरते असं शेलारांनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या महिनाभरातल्या घडामोडी बघितल्या तर यामध्ये कळीचा नारद हे संजय राऊत आहे. जे संजय पराभूत ठरले आहे.. या संजय राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या दोन मित्र पक्षांमध्ये कलह निर्माण केला. तसेच पक्षांतर्ग कलह केला. तर आता माध्यमांमधून असे दिसते आहे की त्यांनी पवार कुटुंबामध्येही कलह निर्माण केला आहे. स्वत:च्या स्वार्थापोटी हे त्यांनी केले आहे. त्यामुळे संजय राऊत कमी बोलले तर त्यात महाराष्ट्रचे हितच राहिल. हे वर्ष संपताना संजय राऊत यांना यावर्षीचा “कलहकार” हा पुरस्कार देऊन गौरविले पाहिजे अशा शब्दात अॅड. आशिष शेलारांनी राऊतांची खिल्ली उडविली आहे.