मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षावरुनशिवसेना-भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहांनी बंद दरवाजाआड केलेली चर्चा सार्वजनिक करत नाही, ही संस्कृती नाही अशा शब्दात शिवसेनेला फटकारल्यानंतर शिवनेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही खोट्याचं राजकारण कधी केल नाही, महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंबांनी त्याग केला आहे. आम्ही महाराष्ट्राचे लोक व्यापारी नाही, व्यापाराचं राजकारण आम्ही केलं नाही, शिवरायांच्या प्रेरणेने महाराष्ट्र काम करतो असा पलटवार शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बंद खोली ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती. त्याच खोलीतून बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, अनेकांना आशीर्वाद दिले. याच खोलीत ही चर्चा झाली. ही खोली नसून आमचं मंदिर आहे. जर कोणी सांगत असेल त्या मंदिरात असं ठरलं नाही तर हा बाळासाहेबांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. त्या मंदिरातील चर्चा पंतप्रधानांना सांगितली गेली नसेल म्हणून आम्ही विरोध केला नव्हता. पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं म्हणून बोललो नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही मोदींचा नेहमी आदर केला आहे करत राहू. जे ठरलं होतं तेच आम्ही सांगितलं, अमित शहांनी मोदींना अवगत केलं नाही, शिवसेना आणि मोदींमध्ये दुरावा निर्माण केला. जर बंद खोलीत ठरलं असेल ते होत नसेल तर ते समोर येतं. हे पंतप्रधानांना माहित असतं तर आज असं घडलं नसतं. आम्ही बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, आम्ही खोटं बोलत नाही असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, आम्ही जो मार्ग निवडला आहे त्यामध्ये आला शिवसेनेला धमकाविण्याचा प्रयत्न करु नका, हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांपासून बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. घाबरविण्याचा अन् धमकविण्याचा आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. आम्ही मरेन पण घाबरणार नाही, मात्र जो असं करेल त्यालाही संपवू असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. पंतप्रधान मोदी व मी तसे जाहीर केले होते. असे असताना दोघांकडे निम्मा-निम्मा काळ मुख्यमंत्रिपद असावे, ही मागणी शिवसेनेने नंतर केली. ती आम्हाला मान्य नव्हती, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले होते आणि अशा बंद दाराआड काय चर्चा होते, हे सांगायचे नसते. ती आमची संस्कृती नाही असा टोला शिवसेनेला लगावला होता.