मुंबई - शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार, हे जवळपास पक्कं झालेलं असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. कुणाच्या ध्यानीमनीही नसलेली गोष्ट आज सकाळी सकाळी घडली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीच, पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवलं.
भाजपा-राष्ट्रवादीच्या या सोयरीकीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी तोडकीच प्रतिक्रिया दिली होती. मात्र, फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीजी है तो मुमकीन है... असे म्हणत केंद्र सरकारच्या पुढाकारानेच ही खेळी यशस्वी ठरल्याचे संकेत दिले आहेत. राज्यात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी पाहायला मिळताहेत आणि शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध रंगताना दिसतंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडल्याचे दिसून येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी, अपक्ष आणि समर्थन देणाऱ्या सर्वच अपक्ष आमदारांचे आभार मानले आहेत. आपली बांधिलकी ही महाराष्ट्रातील जनतेशी आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या समर्थनातून स्थिर सरकार दिलंय. मोदी है तो मुमकिन है.. असे म्हणत फडणवीस यांनी मोदींचेही आभार मानले. मी आपल्याला विश्वास देतो की, 5 वर्षे अत्यंत ताकदीने, मजबुतीने हे सरकार काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या घटनेनुसार राज्य सरकार काम करेल. शेतकऱ्यांच्या हिसासाठी सरकार सदैव तत्पर असल्याचे सांगत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वच भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.