Join us

Maharashtra CM: खासदार अमोल कोल्हे कुणासोबत? एकाच ओळीत दिलं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:53 PM

Maharashtra CM: राज्यभरातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात चलबिचल अवस्था असून ज्येष्ठ नेतेही संभ्रमात आहेत.

मुंबई - राज्यातील राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येशरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कोणते नेते, कोणत्या नेत्यासोबत अशीच चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी राष्ट्रवादीसोबत, मी मरेपर्यंत शरद पवारांसोबत असे, ट्विट करुन म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ हेही पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सातारा जिल्हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. तर पवारांनी साताऱ्यातूनच राष्ट्रवादीच्या झंझावाती प्रचाराची सुरूवात आणि राजकारण बदलणारी सभाही घेतल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा मिळाला होता. शरद पवारांचाच हा करिष्मा असल्यामुळे जिल्ह्यात निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. वाई मतदारसंघातून निवडून आलेले मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील आणि फलटणमधून दीपक चव्हाण हे तीघेही शरद पवार यांच्याच सोबत आहेत. हे सर्व आमदार सकाळीच मुंबईकडे रवाना झाले असून शरद पवार जी भूमिका घेतील त्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यभरातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात चलबिचल अवस्था असून ज्येष्ठ नेतेही संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही सकाळपासून गायब असल्याचं दिसून येतंय. एरवी, क्षणा-क्षणाला ट्विट करणारे मुंडे सध्या अबोल दिसून येतंय. मात्र, राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली, ज्यांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हणत उदयनराजेंविरुद्ध साताऱ्यात सभा घेतली, ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे म्हटलंय. 'साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण!' असे म्हणत अमोल कोल्हेंनी पवारांसोबतचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामुळे, खासदार कोल्हे हे पवारांचे शिलेदार बनून राष्ट्रवादीचं काम करणारंय, हे स्पष्ट झालंय.  

 

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारदेवेंद्र फडणवीस