मुंबई - अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. पण, माझी अंतिम निष्ठा पक्षाबद्दल आणि शरद पवार यांच्याबद्दलच आहे. मी त्यादिवशी बैठकीला उशिरा पोहोचलो हे मी मान्य करतो. मला याबाबतची काहीच माहिती नव्हती. कारण, त्यादिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत मी झोपलेलोच होतो, असे म्हणत अजित पवारांनी ठरवून केलेल्या राजकीय घडामोडींशी माझा काहीही संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांच्या भूमिकेशी असहमत असलेल्या शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. या घडामोडीनंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना सर्वसामान्यांमधून मोठा विरोध होत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी 11 आमदार उपस्थित होते. त्यामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते, असे बोलले जाते. परंतु, अजित पवारांसोबतचे जवळ-जवळ 9-10 आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतले आहेत. तर धनंजय मुंडे संपूर्ण दिवसभर नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते अजित पवारांसोबत आहेत अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित झाले होते. त्यानंतर, आज पुन्हा धनंजय मुंडेंनी आपण कुठे होतो ते सांगितले.
माझं अजित पवारांवर प्रेम आहे, पण माझी अंतिम निष्ठा ही पक्षाशी आणि शरद पवारसाहेबांशी असल्याचं धनंजय मु्ंडेंनी सांगितलंय. तसेच, माझ्या बंगल्यावरुन जरी आमदारांना फोन गेले असले तरी, मी त्यादिवशी बंगल्यावर गेलोच नाही. माझ्या बंगल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, माझा बंगला म्हणजे कधी कधी बस स्टँडच असतंय, असेही धनंजय मुंडेंनी सांगितलं. तसेच, अजित पवारांनी शपथविधी घेतल्यापासून त्यांचा आणि माझा कुठलाही संपर्क झाला नसल्याचेही ते म्हणाले.