मुंबई - राज्यातील राजकारणात अजित पवारांच्या बंडामुळे मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपासोबत हातमिळवणी करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर शरद पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याचं समोर आलं. अजित पवारांनी हा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला. गेल्या २ दिवसांपासून अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांची भेट घेत आहे. यातील काही कार्यकर्त्यांनी ही माहिती.
टीव्ही ९ मराठीच्या वृत्तानुसार बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. राष्ट्रवादी काँग्रेसनं काही महिन्यांपूर्वीच भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेत्यांच्या बैठकीही झाल्या होत्या. मात्र आता हे सगळे नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं अजित पवारांनी सांगितले.
सभागृहात गुप्त मतदान झाल्यास आपण जिंकणारच असा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. आता काही ज्येष्ठ नेते मला भेटत आहेत, मला शब्द फिरवायला सांगितला जातोय असं अजितदादा म्हणाले. मात्र मी आता काही बोलणार नाही, वेळ आल्यावर माझ्या सोयीनं सगळं बोलेन असा गर्भित इशारा अजित पवारांनी दिला आहे.
तसेच केंद्रात भाजपाचे भक्कम सरकार आहे. त्यामुळे केंद्राकडून विकास कामांसाठी भरघोस निधी आपल्याला मिळेल त्यासाठी भाजपासोबत जाणं योग्य आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना अपयश हाती लागणार हे दिसून येत आहे.
दरम्यान, शरद पवारांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा नाही, सभागृहात भाजपा बहुमत सिद्ध करु शकणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार राज्यात येईल. बहुमत नसतानाही भाजपानं सरकार बनविले आहे. अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असा आरोपही शरद पवारांनी केला आहे. मात्र सभागृहात नेमकं बहुमत सिद्ध कोण करतं? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.