मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा अंतिम फैसला विधानसभेतील बहुमत चाचणीदरम्यान लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत त्याचसोबत हंगामी अध्यक्षांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाईल. तसेच गुप्त मतदान करु नये, या चाचणीचं थेट व्हिडीओ प्रक्षेपण करण्यात यावं असंही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारला अवघे २४ तास बहुमत सिद्ध करण्यासाठी मिळाले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. भाजपा कोअर कमिटीचा बैठक एकाबाजूला पार पडत आहेत तर अजित पवारांच्या गाठीभेटीलाही वेग आला आहे. अशातच काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या नेत्यांची हालचाल वाढली आहे. तिन्ही पक्षाच्या आमदारांना एकत्र ठेवणं त्यांच्याशी भेटीगाठी सुरु आहेत. त्याचसोबत उद्याच्या बहुमत चाचणीसाठी महाविकासआघाडीने आणखी एक खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक संध्याकाळी ५ वाजता पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष संयुक्त गटनेता निवडणार आहेत. त्यामुळे निश्चित या महाविकासआघाडीच्या माध्यमातून एक मोठा गट बनवून याची नोंदणी राज्यपालांकडे केली जाऊ शकते.
अजित पवार राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते होते, त्यांनी एका रात्रीत थेट भाजपाला पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचा पाठिंबा भाजपाला असल्याचं सांगितलं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र याचा कोणताही थांगपत्ता शरद पवारांना नव्हता असं सांगण्यात येत आहे. विधिमंडळ नेतेपदी अजित पवार असल्याने त्यांनी दिलेले पत्र राज्यपालांनी ग्राह्य धरून भाजपाला सत्तास्थापन करता आली. मात्र राष्ट्रवादीने आमदारांची बैठक घेऊन पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरुन हटविले. त्यांचे सर्व अधिकार जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांच्या नावाबाबत नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला व्हीप कोणाचा लागू होणार याबाबत संभ्रम असल्याने महाविकासआघाडीचा गटनेता बनविण्याच्या हालचाली सुरु झाल्यात का? अशी चर्चा सुरु आहे.